

Terrorism in Jammu Kashmir
नागपूर : काश्मीरातील पहलगाम येथील मंगळवारी भर दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विविध टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून काश्मीर भागात गेलेले, अडकलेले पर्यटक श्रीनगर येथून सुखरूप परत येत असताना आजपासून या आठवड्यात मोठ्या प्रमाणात काश्मीर फिरायला जाणाऱ्या अनेक पर्यटकांनी आपले सहलींचे नियोजन रद्द केले आहे.
नागपूर, विदर्भ आणि राज्यभरातून या उन्हाळ्यात वैष्णोदेवी, जम्मू काश्मीर फिरायला जाणाऱ्यांचे मोठे बुकिंग झाले होते. आता या घटनेने या आठवड्यातील बुकिंग आणि त्यापोटी लाखो रुपयांचे व्यवहार खोळंबले आहेत. अनेकांनी पूर्ण पैसे भरले ते आता परत मिळणार कधी, याची चिंता आहे. टूर ऑपरेट्स करणारे, ट्रॅव्हल्स कंपनी आणि एजंट यांना हा कोट्यवधी रुपयांचा फटका बसू शकतो.
विदर्भातील मोठ्या प्रमाणात बुकिंग ३० एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी (दि. २४) नागपुरातून अनेकजण पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काश्मीर जाणार होते. मात्र, श्रीनगर येथून परतणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता तिकडे जीव धोक्यात घालून जाण्यास कुणी तयार नाहीत. मे महिन्यातील दौऱ्याबाबतही अनेकांची अनिश्चितता दिसली. श्रीनगरमधील अनेकजण रात्रीच्या विमानाने मुंबई आणि सकाळी नागपूरला परत आले.
नागपूरचे जरीपटका परिसरातील रुपचंदानी कुटुंबीय सुखरूप परतले. रुपचंदानी कुटुंबातील तिघेही सुखरुप आले आहेत. यासोबतच कोराडी येथील पृथ्वीराज वाघमारे आणि इतर ७ कुटुंबीय, काटोल तालुक्यातील मूर्ती येथील प्रफुल्ल देशभ्रतार आणि कुटुंबीय असे अनेक नागपूर जिल्ह्यातील पर्यटक आता नागपुरात आपल्या घरी आले आहेत.