

Hingoli News
सेनगाव : सेनगाव नगरपंचायतीने सिंगल युज प्लास्टिक वापराविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून, बुधवारी (ता. २३) आठवडी बाजाराच्या दिवशी १५ दुकानांवर छापे टाकून तब्बल ४ क्विंटल प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, ग्लास, पात्र, द्रोण आणि अन्य साहित्यांचा समावेश होता. संबंधित विक्रेत्यांकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नगरपंचायतीमार्फत गेल्या अनेक दिवसांपासून सिंगल युज प्लास्टिक विरोधात जनजागृती आणि सूचना करण्यात येत होत्या. मात्र, काही दुकानदारांकडून अजूनही प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे आढळल्याने मुख्याधिकारी गणेश गांजरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने कारवाई केली.
यामोहिमेअंतर्गत स्वतः मुख्याधिकारी गांजरे, लेखाधिकारी अमोल ढोके, बोकारे, कर निरिक्षक मस्के, प्रविण देशमुख, विनायक पडोळे, बिडकर, कांबळे, सुतार, शहर समन्वयक पवन देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सेनगाव शहरातील किराणा व इतर होलसेल दुकाने, अशा १५ ठिकाणी छापे टाकले. या शिवाय आठवडी बाजारातील किरकोळ विक्रेत्यांकडूनही सिंगल युज प्लास्टीक जप्त करण्यात आले. या मोहिमेत पालिका प्रशासनाने तब्बल ४ क्विंटल सिंगल युज प्लास्टीक जप्त केले असून यामध्ये प्रामुख्याने प्लास्टीक पिशव्या, ग्लास, पात्र, द्रोण व इतर साहित्याचा समावेश होता. संबधित विक्रेत्यांकडून सुमारे ५० हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. यापुर्वीही सेनगाव नगरपंचायत मार्फत प्लास्टिक बंदी मोहीम आखली होती त्यात जवळपास २ क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले होते.
मुख्याधिकारी सेनगाव गणेश गांजरे यांनी आवाहन केले आहे की, दुकानातून जाणारे प्लास्टिक शेवटी कचरा संकलनद्वारे कचरा विलगीकरण साईट वर येऊन जमा होते. सदर ठिकाणी एकल वापर प्लास्टिकचा जास्त भार निर्माण होतो. कचरा संकलन ते विलगिकरण याचा एकूण खर्च वाढतो, मनुष्यबळ खर्ची पडते. तसेच पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे नागरीक व व्यापाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टीकचा वापर करू नये.