

औंढा नागनाथ : तालुक्यात वन विभागाच्या पथकाचे दोन ठिकाणी शुक्रवारी (दि.29) रोजी टाकलेल्या छाप्यामध्ये दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागांतर्गत जवळा बाजार येथील एका पेट्रोल पंपाजवळ आमराईमध्ये सागवान व इतर अधिक सुचित वृक्ष प्रजातीची वृक्षतोड करून लाकडांचा साठा केल्याची माहिती विभागीय वनाधिकारी डॉ.राजेंद्र नाळे, वनसंरक्षक सचिन माने यांना मिळाली.
यावरून वनपरेक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल स्वाती कीर्तनकार , वनरक्षक सुधाकर चोपडे व वनरक्षक गंगाधर शिंदे, वाहन चालक भूतनर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी छापा टाकून करीमुद्दिन खमरोद्दीन खतीब (रा.औंढा) यांचे विरुद्ध भारतीय वन अधिनियमचे कलम 41, 42 व 52 अन्वये वन गुन्हा 04/20 26 नोंदविण्यात आला आहे . एकूण 202 नग लाकूड जप्त केले असून त्याचे परिमाण 12.08 घनमीटर आहे. किंमत 1.93.917 एवढी आहे. संशयित खान दौलत खाना अब्बास रा.जवळाबाजार यांनी सागवान प्रजातीची लाकडे अवैधरित्या तोडून वाहतूक करून साठवणूक केल्यामुळे भारतीय वन अधिनियमचे कलम 41, 42व 52 वन गुन्हा क्र. 2/202 नोदविण्यात आला आहे.
वन गुन्ह्यात एकूण 123 लाकुड जप्त केले असून त्याचे परिमाण 5.845 घनमीटर आहे त्याची एकूण किंमत 14.117 एवढी आहे. दोन्ही वन गुण्यात एकूण तोड व वाहतूक परवानगी आवश्यक असलेल्या प्रजातीचा एकूण 17.928 घनमीटर गोलमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मालाची एकूण किंमत 2,08,025 इतकी आहे. वन विभागाकडून पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती सूत्राने दिली असून हिंगोली जिल्ह्यात वृक्षतोड, वनवा, वन्य प्राणी शिकार, निदर्शनास आल्यास वन विभागाच्या 1926 या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. औंढा नागनाथ तालुक्यात वृक्षतोड भरमसाठ वाढल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे, याकडे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.