

Serious Injury in Robbery Hingoli Sengaon
सेनगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील घोरधडी येथील शेत शिवारातील एका आखाड्यावर ४ दरोडेखोऱ्यांनी गुरूवारी (दि.५) रात्री बाराच्या सुमारास दरोडा टाकला. बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवत घरातील दागिने व रोख रक्कम असा अंदाजे ७ लाखांचा मुद्देमाल त्यांनी पळवला. आवाज कराल, तर मारून टाकू, अशी धमकी देऊन सर्वांना एका खोलीत कोंडून ठेवले होते.
सेनगाव तालुक्यातील घोरदडी येथील अशोक माणिक साबळे यांच्या आखाड्यावर चार दरोडेखोरांनी दरोडा टाकला. त्या सर्वांनी काळा रुमाल तोंडाला बांधलेला होता. चाकूचा धाक दाखवत घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने काढून घेतले. सुशिलाबाई माणिक साबळे व रुक्मिना आसाराम साबळे यांच्या हातातील कडे, गळ्यातील मनी मंगळसूत्र, गहू पोत असे सर्व दागिने काढून नेले.
अशोक साबळे यांनी या दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केला. तुमच्या घरातील सर्व दागिने, पैसे आम्हाला द्या अन्यथा तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी दिली. घरातील एका खोलीत सर्वांना कोंडून ठेवले. सर्वांचे मोबाईल घेऊन आजूबाजूला फेकून दिले. घराला बाहेरून कडी लावून घेतली. सकाळी चार वाजण्याच्या सुमारास सर्वजण बाहेर आले व गावातील ग्रामस्थांना माहिती दिली.
अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, शिवसांब घेवारे, जमादार सुभाष चव्हाण, टी. के. वंजारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाला पाचारण केले. तसेच ठसे तज्ज्ञ देखील घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाला दरोडेखोरांचा माग काढता आला नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमी अशोक साबळे यांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने चार पथके स्थापन करून दरोडेखोरांचा माग काढण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. काही संशयितांची चौकशी केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर घटनेच्या वेळी वीज पुरवठा कसा काय खंडित झाला, याची माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.