हिंगोलीत भगरीमुळे १०० जणांना विषबाधा; रेणापुरातील घटना | पुढारी

हिंगोलीत भगरीमुळे १०० जणांना विषबाधा; रेणापुरातील घटना

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे भगर खाल्यामुळे सुमारे १०० पेक्षा अधिक गावकऱ्यांना विषबाधा झाली. त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गावातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी तातडीने गावात आरोग्य पथक पाठवून गावात उपचाराची व्यवस्था केली आहे.

कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे मागील पाच दिवसांपासून धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. मंगळवारी गावात एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमात सायंकाळी भगर व शेंगदाण्याची चटणी देण्यात आली होती. त्यासाठी सोडेगाव येथील दुकानातून भगर आणण्यात आली होती. रात्री १० नंतर भगर वाटप झाली. त्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांना उलटी व चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला. गावातील प्रत्येक प्रभागातून उलटी व चक्कर येण्याचे रुग्ण वाढत असल्याने गावकऱ्यांनी तातडीने आरोग्य प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर रात्री बारा वाजल्यापासून खासगी वाहनाने विषबाधा झालेले रुग्ण हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यास सुरवात केली. सुमारे सहा जीपने ५० पेक्षा अधिक रुग्णांना मंगळवारी सकाळपर्यंत रुग्णालयात दाखल केले. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे.

त्यानंतर बुधवार सकाळपासून रुग्णवाहिकेद्वारे ५० पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी हलविले आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी तातडीने दोन आरोग्य पथक गावात तैनात केले असून गावातच किरकोळ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या शिवाय सर्वच गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. रुग्णांनी घाबरून जाऊ नये सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचे दैने यांनी सांगितले.

हिंगोलीच्या अन्न व औषध प्रशासनाचा परभणीतून कारभार

हिंगोली जिल्हा निर्मिती होऊन सुमारे २४ वर्षाचा कालावधी झाला तरी हिंगोलीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय सुरु झाले नाही. परभणी येथूनच या कार्यालयाचा कारभार पाहिला जात आहे. त्यामुळे जिल्हयात भेसळखोरांना रान मोकळे झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी केवळ महिन्यातून एकदा हिंगोलीत येत असल्याचा आरोप केला जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button