हिंगोली: सेनगाव येथे शिक्षकावर हल्ला करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली: सेनगाव येथे शिक्षकावर हल्ला करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव येथे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात आज (दि.२०) गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित शिक्षकावर हिंगोलीच्या खासगी रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.

येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मा. शी. कोटकर शुक्रवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घराकडे येत असताना तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये तिघांनी त्यांना चाकूने व कोयत्याने भोसकले. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कोटकर यांना सेनगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोलीत हलविण्यात आले. त्यांच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. अखील अग्रवाल यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात सुनीता कोटकर यांनी सेनगावच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये बद्रीनाथ विश्‍वांभर कोटकर, उध्दव विश्‍वांभर कोटकर, गजानन श्रीराम तांबीले यांनी कोर्ट केस व जुन्या वादातून कट रचून कोयता व चाकूने हल्ला केल्याच्या तक्रारीत नमुद केले आहे. यावरून पोलिसांनी वरील तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक चत्तरंजन ढेमकेवाड पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button