हिंगोली : कुलस्वामिनी अर्बन बॅंक फसवणूक प्रकरण; पतसंस्थेच्या महिला अध्यक्षासह पतीस अटक | पुढारी

हिंगोली : कुलस्वामिनी अर्बन बॅंक फसवणूक प्रकरण; पतसंस्थेच्या महिला अध्यक्षासह पतीस अटक

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : येथील कुलस्वामिनी अर्बन पतसंस्थेच्या सभासदांची 10 कोटी 86 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या महिला अध्यक्षासह तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयाने २५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

येथील कुलस्वामिनी अर्बन पतसंस्थेमध्ये संचालक मंडळासह कर्मचारी व इतरांनी सभासदांना ठेवीवर वाढीव व्याजदर देण्याची आश्वासन दिले होते. त्यानुसार पतसंस्थेच्या सभासदांनी या पतसंस्थेकडे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र या ठेवीची मुदत संपल्यानंतर पतसंस्थेकडून सभासदांना व्याजासह रक्कम देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. त्यावरून सभासदांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने पतसंस्थेची चौकशी सुरू केली. या चौकशीत पतसंस्थेच्या 4800 सभासदांची 10 कोटी 68 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरून पतसंस्थेच्या संचालक मंडळासह कर्मचारी व इतर अशा 16 जणांवर 6 डिसेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक बाबुराव जाधव, रामराव पोटे, जमादार नामदेव जाधव, विलास सोनवणे, पाटील यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता.

यामध्ये पतसंस्थेचे अध्यक्षा अर्चना खर्जुले व तिचा पती कैलास खर्जुले हे दोघेजण बुलढाणा जिल्ह्यात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या पथकाने बुलढाणा जिल्ह्यात जाऊन गुरूवारी पहाटे दोघांना अटक केली. त्यांना हिंगोलीच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

Back to top button