हिंगोली : सेनगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा | पुढारी

हिंगोली : सेनगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे हातबल झाला आहे. प्रशासनाकडून त्यांच्या प्रश्नांची  गांभीर्याने दखल घेतली जात नाही. याच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज (दि. १५) तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. येथील सापडगाव पाटी ते तहसील कार्यालयापर्यंत आज सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या २०२३-२४ मध्ये खरीप, रब्बी पिकांवर येल्लो मोझ्याक रोग पडला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दैनंदिन गरजा भागविणे अवघड बनले आहे. महसूल विभागाकडून पीक नुकसानीचे पंचनामे केले जात आहे. परंतु, नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच पीक विम्याची रक्कमही मिळाली नाही. तत्काळ पीक नुकसान भरपाई व पीक विमा मिळावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शेतकरी नेते मारुती गीते, महादेव हारण, वसंतराव अवचार, नामदेव गीते, संतोष खोडके, बंडू दळवी यांच्यासह शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार  गायकवाड यांना दिले.

हेही वाचा 

Back to top button