हिंगोली : एसटी बसची ऑटोला धडक, चालकाचा मृत्यू | पुढारी

हिंगोली : एसटी बसची ऑटोला धडक, चालकाचा मृत्यू

हिंगोली;  पुढारी वृत्तसेवा : औंढा-नागनाथ परभणी महामार्गावर वगरवाडी जवळ एसटीने ऑटोला धडक दिली. यामध्ये ऑटोचालक गंभीर जखमी झाला. चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासह तिघे प्रवासी जखमी झाले. ही घटना आज (दि. ९) सकाळी ११ च्या दरम्यान घडली.

वगरवाडी तांडा येथील गुलाब हिरामण पवार (वय ४५) आपले प्रवासी वाहन (एम एच 22 एल टी 2378) घेऊन नागेशवाडी येथूनऔंढा नागनाथकडे जाताना पाठीमागून येणाऱ्या एसटी बसने (एम एच 20 बी एल 2532) जोराची धडक दिली. या ऑटो चालकासह प्रवासी बाहेर फेकले गेले.

अपघातात ऑटो चालक गुलाब पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर ऑटो मधील प्रवासी लक्ष्मण तुकाराम काळे (२२ वर्ष, राहणार चोंढी काठोडा), सीताबाई शेकूराव धनवे (६७ वर्ष), नितीन मुश्ताक पठाण हे जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचार करून त्यांना हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गुलाब हिरामण पवार यांचा हिंगोली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळी धाव घेत हट्टा पोलिसांनी पंचनामा केला. या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button