अखेर हिंगोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता; 485 कोटी रुपयांचा निधी मंजूर | पुढारी

अखेर हिंगोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता; 485 कोटी रुपयांचा निधी मंजूर

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अखेर शासनाने मान्यता दिली. यासोबतच 430 खाटांचे रुग्णालय देखील मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात आता वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधेसह गंभीर आजारी रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळणार आहे.

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे अशी मागणी मागील तीन वर्षापासून केली जात होती. शासनाने देखील नवीन जिल्ह्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूर देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हिंगोली जिल्ह्याला यातून वगळण्यात आले होते. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. हिंगोलीत वैद्यकीय महाविद्यालय तसेच 430 खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यासाठी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर यांनी शासनस्तरावर पत्र देऊन पाठपुरावा केला होता. त्यानंतर हिंगोलीत महाविद्यालय स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

दरम्यान, शासनाने हिंगोलीत 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय रुग्णालय तसेच 430 खाटांचे रुग्णालय मंजूर केले आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालय तूर्तास शासकीय रुग्णालयाच्या इमारतीमध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर महाविद्यालय व रुग्णालयाची इमारत 22 हेक्टर क्षेत्रामध्ये उभारली जाणार आहे. यासाठी 485 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील चार वर्षात टप्प्याटप्प्याने हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. उशिरा का होईना हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 430 खाटांचे रुग्णालय मंजूर झाल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना तातडीची व अत्याधुनिक आरोग्य सेवा मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाची सोय उपलब्ध होणार आहे.

हिंगोली येथे मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी वाढीव कर्मचारीपदे मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये वर्ग एकची 48, वर्ग दोनची 44, वर्ग तीनची 93 तसेच बाह्यस्त्रोतद्वारे वर्ग तीन ची 139 पदे, वर्ग चार ची 65 पदे मंजूर करण्यात आली आहेत.

हेही वाचा :

Back to top button