

14-year-old student dies of electric shock
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील सुकळी कोठारी येथील रहिवासी असलेला चैतन्य प्रकाश नरवाडे (१४) हा औंढा येथील वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. शनिवारी सकाळी साडे नऊच्या सारास रूपूर शिवारात चिंचा तोडण्यासाठी तो झाडावर चढला असता, झाडातून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा त्याला स्पर्श झाला. या भीषण अपघातात चैतन्यचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
तालुक्यातील सुकळी कोठारी येथील चैतन्य नरवाडे हा मुलगा औंढा तालुक्यात एका वस्तीगृहामध्ये राहातो. तो इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेतो. त्याचे कुटुंबीय कामाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. त्यामुळे तो वस्तीगृहामध्येच राहू लागला होता. दरम्यान शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चैतन्य हा भरपूर शिवारामधील एका शेतात चिंचेच्या झाडावर चिंचा खाण्यासाठी गेला होता.
यावेळी झाडावर चढून चिंचा तोडत असताना झाडामधूनच गेलेल्या विद्युत वाहिनीला त्याचा हात लागला. यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्या ठिकाणीच तो विद्युत वाहिन्यांना चिटकून बसला. यावेळी झालेल्या आवाजामुळे परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावले. त्यांनी चिंचेच्या झाडावर पाहणी केली असता चैतन्य मृतावस्थेत दिसून आला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार जी.बी. गिरी, रविकांत हरकाळ यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर चैतन्य याचा मृतदेह खाली काढून रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी प्रज्ञा नरवाडे यांच्या माहितीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.