आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : शेवाळा (ता. कळमनुरी) येथील एका हॉटेलमध्ये धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. गौतम नरवाडे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज (गुरूवार) सकाळी दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुस्तफा जिलानी (वय २५) या संशयीत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
गौतम आज सकाळी शेवाळा येथे एका हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी त्याच्यावर मुस्तफा याने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गौतमचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपविभागीय अधिकारी किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक पी.सी.बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार नागोराव बाभळे यांनी पंचनामा केला. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर आरोपीला ताब्यात द्या, अशी मागणी करत नरवाडेंच्या नातेवाईकांनी नांदेड-हिंगोली मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या घटनेची नोंद आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.