

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. बाजार समितीवर प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक आसाराम गुसिंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज (दि.२०) दुपारी पदभार स्वीकारला.
कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली जिल्हयातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओखळली जाते. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात 114 गावे असून कुरुंदा येथे उपबाजारपेठ आहे. वसमत व कुरुंदा या ठिकाणी हळद, सोयाबीन पिकाची सर्वात जास्त खरेदी विक्री होत असून त्यातून बाजार समितीला बाजार शुल्कातून ३ कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. जिल्हयातील मोठी बाजार समिती असल्यामुळे या बाजार समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न केले जातात.
दरम्यान, ऑगस्ट 2021 मध्ये या समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले होते. मागील एक वर्षापासून अशासकीय प्रशासक मंडळाकडून बाजार समितीचा कारभार पाहिला जात होता. विशेष म्हणजे अशासकिय प्रशासक मंडळ ६ महिन्यासाठीच कार्यरत असतानाही शासनाने मुदतवाढ दिली होती. त्यामुळे अशासकीय प्रशासक मंडळाने एक वर्ष कारभार पाहिला आहे.
त्यानंतर जिल्हा उपनिबंधक एस. एल. बोराडे यांनी अशासकिय प्रशासक मंडळ बरखास्त केले. या ठिकाणी प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक आसाराम गुसींगे यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हा उपनिबंधक बोराडे यांनी काढले आहे. तर गुसींगे यांनी मंगळवारी पदभार घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान आता बाजार समितीच्या निवडणुका कधी जाहीर होणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचलंत का ?