पुढारी ऑनलाईन डेस्क : महसा अमिनी या २२ वर्षीय महिलेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर इराणमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. महसाला न्याय मिळवून देण्याची मोहीम आता तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून महसाच्या मृत्यूचा निषेध करत आहेत. आंदोलक महिलांनीही चेहऱ्यावरील हिजाब काढून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
हिजाबसक्तीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महसा अमिनी या महिकेला पोलीसांनी अटक केली होती. त्यानंतर तिला पोलीसांनी अमानुषपणे मारहाण केली. अखेर कोठडीतच तिने शुक्रवारी पारण सोडले. मीडिया रिपोर्ट्समध्ये मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी मेहसा पोलिसांच्या ताब्यात होती. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे म्हणणे आहे की, महसा अमिनी यांना तेहरानमधून अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळले असून, अमिनी हिला कोठडीत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
महसा अमिनीच्या मृत्यूचे वृत्त देशातील नेक भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले. यानंतर राजधानी तेहरान आणि मशहादसह अन्य शहरांमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्येही सरकारचा निषेध केला जात आहे. या आंदोलनात अनेक ठिकाणी महिलांनी केस कापून हिजाब जाळले आहे. याचे व्हिडिओही या महिलांनी सोशल मीडियातून शेअर केले आहेत. अनेक ठिकाणी अशा घटनांनंतर महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसाचार झाल्याची माहिती समोर येत आहे.
इराणमध्ये १९७९ साली झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर देशात बाहेर फिरताना महिलांना हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली होती. डोकं, केस आणि मान झाकली जाईल, अशा पद्धतीचा हिजाब महिलांनी घालावा, असा नियमच इराणमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर आता महिलांनी हिजाबविरोधात आंदोलन सुरू केल्यामुळं राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी आंदोलक महिलांवर लाठीचार्ज केल्यानंतर महिलांनी हिजाब उतरवून सरकारचा निषेध केला आहे. तेहरान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन करत असलेल्या अनेक महिलांनी ड्रेसकोडचं पालन केलेलं नाही, त्यावेळी आम्ही त्यांना स्थानबद्ध करून त्यांना हिजाब घालण्यास सांगितलं होतं. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यानं महिलांशी आंदोलनादरम्यान गैरवर्तन केलेलं नाही. ज्या महिलेचा मृत्यू झालेला आहे, त्या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.