

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : पारंपरिक शेतीला फाटा देऊन बाजारात बारमाही मागणी असलेल्या फुलांची शेती करून औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील युवा शेतकर्याने आर्थिक प्रगती साधली आहे. त्यांने ४ एकरच्या फूल शेतीतून खर्च वजा जाऊन वर्षाकाठी ५ लाखांचे उत्पन्न घेतले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील कैलास गणेशराव वानखेडे यांच्याकडे वडिलोपार्जित १२ एकर शेती आहे. परंतु, यापूर्वी ते हंगामानुसार पिके घेत होते. सुरूवातीला त्यांनी सोयाबीन, हरभरा, हळद यासारख्या पिकांतून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, निसर्गाने साथ दिली नाही. त्यामुळे हळूहळू कैलास हा फुलशेतीकडे वळला. १ एकर क्षेत्रावर गुलाबाची, तर उर्वरित ३ एकर क्षेत्रावर असपेरा, ब्ल्यु डीजी, गलांडा, कलर अष्टर, गोल्डन बुके नावाच्या फुलांची लागवड केली. विशेष म्हणजे गुलाबाला बारमाही मागणी राहत असल्याने त्यांनी १ एकर क्षेत्रावर गुलाबाची लागवड केली.
८ दिवसांतून बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करून रोपांची निगा राखली जात आहे. ४ ते ५ दिवसाआड पाणी दिले जाते. ठिबकद्वारे पाणी दिले जात असल्याने पाण्याची बचतही होत आहे. ४ एकर क्षेत्रातून खर्च वजा जाता वर्षाकाठी ५ ते ७ लाखांचे उत्पन्न पदरात पडत आहे. आगामी काळात आधुनिक फूल शेती करून दर्जेदार फुलांची निर्मिती करण्याचा निर्धार कैलास वानखेडे यांनी केला आहे. फूलशेतीमध्ये त्यांचे संपूर्ण कुटूंब परिश्रम करतात. आई, वडील, भाऊ, पत्नी, भावजयी यांचाही कैलास यांना मोठा हातभार मिळत आहे. आपल्याच शेतात त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळत असल्याने त्यांना आर्थिक लाभ मिळत आहे.
माझे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शेतात वेगळा प्रयोग करण्याच्या दृष्टीने मी सुरूवातीला गलांडा फुलांची लागवड केली. हळूहळू बाजाराचा कल लक्षात घेऊन गुलाबासह इतर फुलांचीही लागवड केली आहे. यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. भविष्यात बँकेकडून कर्ज उपलब्ध झाल्यास पॉली हाऊसमध्ये फूल लागवड करण्याचा मानस कैलास यांनी व्यक्त केला.
हेही वाचा