हिंगोली: औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री यात्रेची तयारी पूर्ण | पुढारी

हिंगोली: औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री यात्रेची तयारी पूर्ण

औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा : तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर प्रशासनासह पोलीस प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. विजया एकादशीपासून मंगळवारपर्यंत (दि. २१) रथोत्सव सुरू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंदिर परिसरामध्ये स्वच्छता, विद्युत रोषणाई, दर्शन रांग, वाहन तळ याची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

औंढा नागनाथ येथे २१ पोलीस अधिकारी, ११० पोलीस कर्मचारी, ५० होमगार्ड, एसआरपीएफचे जवान आदींचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मंदिर व बस स्थानक परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दक्षता पथक तैनात केले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेतली जाणार आहे.

आमदार संतोष बांगर, डॉ. कृष्णा कानगुले, पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जयस्वाल, अध्यक्ष कपिल खंदारे, उपाध्यक्ष साहेबराव देशमुख, अनिल देशमुख, अज्जू इनामदार, मंदिर संस्थानचे व्यवस्थापक नागनाथ पवार यांनी यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला.

हेही वाचा 

Back to top button