गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील शेतकरी शासनाच्या ढिसाळपणाला कंटाळलेले आहेत. विविध मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क गाव विक्रीसाठी काढले असल्याचे निवेदन आज (दि. १६) तहसीलदार कार्यालयामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.
गेल्या तीन चार वर्षापासून निसर्ग अवकृपेमुळे शेतकऱ्यांना विविध संकटाशी सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी सुलतानी संकट घोंघावत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप हंगाम सुरुवातीपासून कळस गाठला आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असताना शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची मदत अद्यापही वाटप केली नाही.
विमा कंपनीने पीक विमा अद्याप दिलेला नाही. वीज पुरवठा सुरळीत करा, कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी, खासगी फायनान्सचे कर्ज माफ करा, हिंगोली जिल्हा आत्महत्या ग्रस्त घोषीत करा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या, या विविध मागण्यांसंदर्भात गाव विक्रीला काढल्याचे निवेदन तहसीलदार कार्यालयामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. या निवेदनावर शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
हेही वाचलंत का ?