

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी शहरात झालेल्या भांडणातील जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर शनिवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणीही समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये रुग्णालयाचे किरकोळ नुकसान झाले असून ११ जण जखमी झाले. पोलिस अधिकारी व कर्मचारी वेळेत रुग्णालयात पोहचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
या हाणामारीत शेख मेहराज शेख मस्तान, शेक अल्ताफ शेख मुजीब, शेख अफनानोद्दीन शेख कलीमोद्दीन, शेख सिबनेन शेख सहसीन, सोहेल पठाण बाबर पठाण, फारुख पठाण समशेरअली पठाण, नोमान पठाण अप्पू पठाण, लुकमानोद्दीन सिद्दीकी ताजोद्दीन सिद्दीकी, इरफान पठाण अप्पू पठाण, सलमान पठाण अफरोज पठाण, ओसामा सिद्दीकी हे ११ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी अद्याप तक्रार नसल्यामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कळमनुरी शहरात नाईकवाडी मोहल्ला भागात शुक्रवारी रात्री किरकोळ कारणावरून शाब्दीक वाद झाला. त्यातून वाद वाढत गेल्याने हाणामारीला झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे तिघे जण जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच जखमींचे समर्थक पुन्हा भिडले. रुग्णालयात अचानक हाणामारी सुरु झाली. यामध्ये रुग्णालयातील आयव्ही स्टँडचा वापर करण्यात आला. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक सोनुळे, जमादार एस. पी. सांगळे, प्रशांत शिंदे, गजानन होळकर, कैलास सातव यांच्या पथकाने वाढीव पोलिस बंदोबस्त सोबत घेऊन तातडीने रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी जमावाला शांत करून पांगवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
हेही वाचा :