हिंगोली : वरुड तांडा शिवारात दोन दुचाकींचा अपघात; एक तरुण जागीच ठार

हिंगोली : वरुड तांडा शिवारात दोन दुचाकींचा अपघात; एक तरुण जागीच ठार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर ते नांदेड मार्गावर वरुड तांडा शिवारात दोन दुचाकींच्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे घडली. सतीश भगवानराव नरवाडे (वय 22, रा. जवळा पांचाळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील सतीश नरवाडे हा तरुण त्याच्या दुचाकीवरून शुक्रवारी नांदेडला गेला होता. त्यानंतर काम आटोपून तो परत जवळा पांचाळ येथे निघाला होता. तो वरुन तांडा शिवारात येथे आल्यावर एका दुचाकी वाहनाने सतीशच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात सतीश गंभीर जखमी होऊन अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागी मृत्यू झाला.

दरम्यान शनिवारी पहाटे 5 वाजता ही घटना आखाडाबाळापूर पोलिसांना कळाल्यानंतर आखाडाबाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मृत सतीश नरवाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

logo
Pudhari News
pudhari.news