

Why are there no service roads in Tuljapur?
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर शहरातील अतिक्रमण आणि गायब होत चाललेल्या सर्व्हिस रोडच्या मुद्दधावर आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मोठी चर्चासत्रे रंगू लागली आहेत. राज्य महामार्गावरील आणि प्रमुख मार्गाच्या लगत असलेल्या सर्व्हिस रोडचे काम अनेक वर्षापासून रखडले असून, जिल्हा प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये आणि मतदारांमध्ये दिसून येत आहे.
तुळजापुरातील नळदुर्ग महामार्गालगत नवीन कोर्ट व तहसील कार्यालय उभारण्यात आले आहे. अशा महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड असणे अत्यावश्यक मानले जाते. मात्र, जागा मालक आणि गुत्तेदारांमधील वादामुळे या मार्गावरील सर्व्हिस रोडचे काम अद्यापही थांबलेले आहे.
परिणामी, वाहतुकीची मोठी कोंडी आणि अपघातांचा धोका कायम राहिला आहे. तुळजापूर विकास प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर धाराशिव रोडवरील सारा गौरव ते इच्छापूर्ती गणपती तसेच अपसिंगारोड ते जुने बसस्थानक, तसेच लातूर रोडवरील रोचकरी कॉम्प्लेक्स ते भात संशोधन केंद्र आणि तेथून लातूर कॉर्नरपर्यंत सब्र्व्हिस रोडची तरतूद करण्यात आली होती. शासनाने निधी उपलब्ध करूनही बहुतांश कामे अद्याप अपूर्णच आहेत.
कोणत्या घटकांकडून ही कामे अडवली जात आहेत आणि प्रशासनाची भूमिका नेमकी काय, यावर मतदारांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वाहतूक शिस्तबद्ध व सुरळीत करण्यासाठी सर्व्हिस रोड अत्यावश्यक आहे. हे काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्हाधिकारी आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी वरिष्ठ पातळीवर चौकशी करून गुत्तेदार व संबंधित विभागांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रक्कम घेतली, जागा सोडली नाही
तुळजापुरातील सर्व्हिस रोडसाठी आवश्यक जागेची भरपाई अनेक जागामालकांनी स्वीकारली असली तरी प्रत्यक्ष जागा मात्र प्रशासनाला हस्तांतरित केलेली नाही. त्यामुळे काम ठप्प झाले असून, प्रशासन मात्र याकडे पाहत बसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.