

The Khwaja Badruddin Chishti Urs has begun.
परंडा, पुढारी वृत्तसेवा : ग्रामदैवत सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती यांच्या ७०६ व्या उरुसानिमित्त सोमवारी (दि. २९) परंडा शहरात पारंपरिक व भक्तीमय वातावरणात संदल मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी तहसील कार्यालयातून तहसीलदार व विविध मान्यवरांच्या डोक्यावर मानाची फुलांची चादर घेऊन मिरवणुकीस सुरुवात झाली. यापूर्वी सकाळी १० वाजता कलश मिरवणूक उत्साहात पार पडली.
मानाची चादर नायब तहसीलदार विजय बाडकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या डोक्यावर देण्यात आली. त्यानंतर फुलांची मानाची चादर गणेशसिंह सिद्दीवाल यांच्या मानाच्या घोड्यावर टाकण्यात आली. या प्रसंगी नायब तहसीलदार विजय बाडकर, नगराध्यक्ष जाकीर सौदागर, जि. प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, माजी सभापती नवनाथ जगताप, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, माजी नगराध्यक्ष मुकुल देशमुख, रिप ब्लिकन पक्षाचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, उद्योजक काकासाहेब साळुंके, शिव सेना तालुकाप्रमुख मेघराज पाटील, विश्वजित पाटील, संजय महाराज पुजारी, सुभाष शिंदे, ड. जहिर चौधरी, जनार्दन मेहेर, वाजिद दखनी, इस्माईल कुरेशी, नगरसेवक रमेशसिंह परदेशी, मतीन जिनेरी, राहुल बनसोडे, समरजितसिंह ठाकूर, मदनसिंह सिद्दीवाल, सत्तार पठाण, अब्बास मुजावर, शरीफ तांबोळी, समीर मुजावर, रत्नकांत शिंदे, बाशा शहाबर्फीवाले, शब्बीर पठाण, नदीम मुजावर तसेच उरूस कमिटीचे अध्यक्ष अकील मुजावर, उपाध्यक्ष शहारूख मुजावर, सचिव हाजी अब्दुल मुजावर, निसार मुजावर आदींसह विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वधर्मीय समाजबांधव मोठ्या संख्येने संदल मिरवणुकीत सहभागी झाले होते. तहसील कार्यालयातून निघालेली मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे शहरातील मुख्य बाजारपेठेतून रात्री १० वाजता दर्गाह येथे पोहोचली. त्यानंतर मानाच्या घोड्याने धावत ४० दगडी पायऱ्या चढून मुख्य मझारीजवळ दर्शन घेतले. हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. धार्मिक पठणानंतर मझारीवर मानाची फुलांची चादर चढवण्यात आली. यावेळी दर्गाह परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले.
उरुसानिमित्त शहरातील बाजार मैदान व दर्गा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दर्गाह परिसरात रहाट पाळणे, खेळणी, सौंदर्यप्रसाधने, फुगे, मिठाई आदींची दुकाने थाटण्यात आल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाविकांसाठी उरुस कमिटी व भक्तांच्या वतीने चार दिवस भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.