

तुळजापूर ः महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्ती देवता तुळजाभवानीमातेच्या सध्या येथे सुरू असलेल्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील तिसऱ्या माळेला मंगळवारी (दि. 30) मातेच्या शोड्षोपचार पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा बांधली. या अवतार पूजेचे दर्शन घेण्यासाठी हजारों श्रद्धाळूंनी मंदिरात गर्दी केली होती.
मंगळवारी सायंकाळी तुळजाभवानी मातेची मंदिराभोवती भव्य-दिव्य छबिना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आराधिनी महिलांसह भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यावेळी ‘आई राजा उदो उदो’, ‘सदानंदीचा उदो उदो’च्या जयघोषाने सारा मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. बुधवारी सकाळी जलकुंभाच्या मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडणार असल्याने सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व दर्शन पासेस बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असून काही काळापुरते धर्म दर्शनही बंद ठेवण्यात येणार आहे. पापनास तीर्थापासून जलयात्रेचा सोहळा निघणार आहे.
बुधवारी (दि. 31) शाकंभरी नवरात्र महोत्सवातील चौथी माळ असून यानिमित्ताने जलयात्रेचा पारंपरिक धार्मिक सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने महिलांच्या उत्साहाला उधाण येणार असून जलकुंभाच्या मिरवणुकीत शहर व परिसरातील हजारो सुवासिनी, कुमारिका, आराधिनी महिला, देवीचे सेवेकरी, गोंधळी, वाघ्या- मुरळी आदींसह मोठ्या संख्येने भक्त, मंदिराचे महंत, पुजारी, या नवरात्र महोत्सवाचे यजमान, मंदिराचे कर्मचारी-अधिकारी, पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी सहभागी होत असतात. या सर्वांच्या सहभागामुळे यावर्षीचा उत्साह आगळा वेगळा असणार आहे. जलयात्रेच्या अग्रभागी असलेल्या शाकंभरी देवीच्या प्रतिमा मिरवणुकीसाठी प्रतिवर्षी बाहेरून बँजो पथक व चांदीचा रथ मागविण्यात येत असून ही मिरवणूक पापनास तीर्थापासून सकाळी सात वाजता इंद्रायणी देवीचे दर्शन घेऊन मंदिराकडे सवाद्य आगेकूच करणार आहे. यावेळी इंद्रायणीदेवीसमोर असलेल्या पवित्र कुंडातील पाण्याने भरलेले जलकुंभ डोईवर घेत हजारो महिला-कुमारिकांचा सहभाग असलेली ही जलयात्रा मंदिराकडे प्रस्थान ठेवणार असून रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या वाहनातून शाकंभरीदेवीच्या प्रतिमेची मिरवणूक देवीच्या पारंपरिक वाद्यांसह ‘आई राजा उदो उदो’च्या उद्घोषात सकाळी 11 वाजता मंदिरात पोहोचते. या सोहळ्यात यजमान, मंदिराचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, मातेचे मुख्य महंत, सेवेकरी,आराधी महिला भगिनीं उत्साहाने सहभागी होतात.
जलयात्रेतील महिलांना कलश वाटपासह अन्नदानाचे(महाप्रसाद) वाटप होणार बुधवारी सकाळी निघणाऱ्या जलयात्रेच्या मिरवणुकीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असून प्रत्येक सहभागी महिलांना यावेळी प्लास्टिक कलश भेट दिले जाणार आहेत.दरम्यान देवीची सेवा म्हणून जलयात्रेत स्वयंस्फूर्तीने सामील होणाऱ्या व्यक्तींना कुठलीही जात-पात,पंथ आडवा येत नाही. परिणामी जलकुंभ मिरवणुकीसाठी शहरासह परिसरातील हजारो सुवासिंनी महिलांचा सहभाग अपेक्षित मानला जात आहे.दरम्यान श्री तुळजा भवानी प्रक्षाळ मंडळातर्फे प्रतीवर्षाप्रमाणे जलयात्रेतील सहभागी महिलांना प्लास्टिक कलश वाटप करून त्यांच्यासाठी अन्नदानाच्या (महाप्रसाद) कार्यक्रमाचे आयोजन भवानी रोडवरील भाजी मार्केट परिसरात सकाळी 11 ते 2 वाजेदरम्यान करण्यात आले आहे. जलयात्रेत सामील महिला सुवासिनी, कुमारिकांची मंदिर संस्थानकडून यावेळी खणा-नारळाने ओटीही भरली जाते.