

The 136-year-old school awaits its former glory
डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर : निजाम राजवटीत सुरू झालेली आणि सुमारे शंभर वर्षे दिमाखात वाटचाल करीत असलेली जिल्हा परिषद प्रशाला आज मात्र प्रशासनाच्या व समाजाच्या दुर्लक्षामुळे मरणयातना भोगत असल्याचे चित्र आहे. प्रशासन व शहरवासीयांनी थोडी संवेदनशीलता दाखवली, तर ही ऐतिहासिक प्रशाला पुन्हा एकदा वैभवशाली होऊ शकते, असा विश्वास माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेला भेट दिली असता शाळेच्या बाहेरील परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी व दुरवस्थेचे चित्र दिसून आले. १९९० पर्यंत येथे पहिली ते दहावी तसेच अकरावीबारावीचे (विज्ञान शाखा) वर्ग चालत होते. मात्र शिक्षणाच्या खाजगीकरणानंतर खाजगी संस्थांची संख्या वाढली आणि जिल्हा परिषदेच्या शाळा अडचणीत आल्या. आज या प्रशालेत केवळ सुमारे शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
माजी विद्यार्थी बाळासाहेब शामराव व महेश कुलकर्णी यांनी या शाळेत माजी विद्यार्थी संमेलन घेऊन शाळा परिसराची स्वच्छता, तसेच प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून विद्यार्थीसंख्या वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला.
१८८९ साली सुरू झालेल्या या शाळेला १९४६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. क. भ. प्रयाग, व. ग. सूर्यवंशी, बिंदुमाधव जवळेकर, शहाणे गुरुजी, खिचडे गुरुजी, पांढरे गुरुजी यांसारखे विद्वान शिक्षक येथे कार्यरत होते. या शाळेतून अनेक नामवंत शास्त्रज्ञ, वकील, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक व मंत्रालयीन सचिव घडले आहेत.
अश्रू अनावर
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशालेतील सेविका प्रवरा प्रकाश हंगरेकर यांनी शाळेबद्दल भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. २६ वर्षांच्या सेवेत एकही रजा न घेता शाळेसाठी काम केले. अनेक अडचणींवर मात करून स्वच्छता व सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले. आजही प्रशासन व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांतून शाळा पूर्ववैभव प्राप्त करेल, याच आशेवर जगते आहे," असे त्यांनी सांगितले.