

Contribute to nation-building by upholding constitutional values: Sarnaik
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महार-जाच्या स्वराज्याच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन असंख्य वीरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. अपार यातना सहन करत त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. या सर्व थोर स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान भारताच्या स्वातंत्र्य व प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया आहे. त्यामुळे राज्यघटनेने घालून दिलेल्या संविधानिक मूल्यांचे पालन करुन राष्ट्रनिर्मितीत सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
पोलिस कवायत मैदान क्र. २ येथे ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थिताना संबोधित करताना श्री. सरनाईक बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक बुबासाहेब जाधव, भास्करराव नायगावकर, नामदेव माने, श्रीपती जावळे, बाबुराव तवले, शे षराव बनसोडे, कलावती उंबरे, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भारतीय राज्यघटना ही देशाला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी असून २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारलेली ही राज्यघटना कोट्यवधी नागरिकांच्या स्वप्नांचे व आत्मसन्मानाचे प्रतिबिंब आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, या राज्य घटनेमुळे भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगात ओळखला जात असून स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व सामाजिक न्याय या मूल्यांवर देशाची उभारणी झाली आहे.
जात, धर्म, लिंग वा भाषा यांचा भेद न करता प्रत्येक नागरिकाला सन्मानाने व सुरक्षिततेने जगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. परेडमध्ये पोलीस पुरुष महिला, गृह रक्षक दल, एनसीसी, पोलीस बँड पथक, तुळजापूर सैनिक स्कूलचे विविध शाळांचे एनसीसी पथक तसेच स्काऊट गाईडचे पथक सहभागी झाले होते.
यावेळी पोलिसांचे वज्र, शीघ्र कृती दल, श्वान कॅप्टन, बेवारस वस्तूपासून सावधान, दंगल नियंत्रण पथक, आ-पत्ती व्यवस्थापन दलाचा चित्ररथ, वन विभाग, कृषी विभाग, १०८ रुग्णवाहिका, अग्निशमन दल चित्र-रथाच्या माध्यमातून सहभागी होते. सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले.