

We will shut down banking services if a five-day work week is not implemented
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पाच दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची जिव्हाळ्याची मागणी केंद्र सरकारने तत्काळ मान्य करावी, या मागणीसाठी आज बँक कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला. याचे परिणाम शहरासह जिल्ह्यातही पहायला मिळाले. दरम्यान, ही मागणी मान्य न झाल्यास भविष्यात बँकींग सेवा ठप्प करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.
स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनचे नेते गोरखनाथ लवटे यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत बँकांमधील कामाचा बोजा प्रचंड वाढलेला आहे. आठ तासांच्या कामकाजाची मर्यादा असतानाही कर्मचाऱ्यांना दहा ते बारा तास काम करावे लागत असून सुट्टीच्या दिवशीही बँकेत येऊन प्रलंबित कामे करावी लागत आहेत.
बँकांचा व्यवसाय वाढत असताना कर्मचारी संख्या मात्र घटत असल्याने कर्मचाऱ्यांवर तणाव वाढत आहे. बाराव्या द्विपक्षीय करारा वेळी सहा महिन्यांत पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दोन वर्षे उलटून बँक कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारला इशारा गेल्यानंतरही आयबीए व केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. विविध संशोधन अहवालांमधून बँक कर्मचारी तणावग्रस्त अवस्थेत काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कामकाज व जीवन संतुलन तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी पाच दिवसांचा आठवडा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने वेळीच मागणी मान्य न केल्यास दोन दिवसीय अथवा बेमुदत संप करून संपूर्ण बँकिंग व्यवस्था ठप्प करण्याचा इशारा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दिला आहे.
यावेळी एसबीआय स्टाफ युनियनचे पदाधिकारी अंकुश चव्हाण, श्रीचंद निलंगेकर, एसबीआय ऑफिसर्स असोसिएशनचे पदाधिकारी पद्माकर चांदणे, अविनाश कडू, एआयबीइए संघटनेचे शाहनवाज मुलानी, प्रमोद सुरवसे यासह धाराशिव शहर व परिसरातील १०० पेक्षा अधिक कर्मचारी व विविध बँकांमधील संघटनेचे सभासद उपस्थित होते.