

Thackeray welcomed in Dharashiva with a garland of two hundred kilos
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यानिमित्त शहराच्या प्रवेशद्वारावर रविवारी शिंगोली सर्किट हाऊससमोरील महामार्गावर शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी उद्धव ठाकरे यांना २०० किलो वजनाचा भव्य हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. घोषणाबाजी, जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात शिवसैनिकांनी आपल्या पक्षप्रमुखांचे स्वागत केले. या स्वागतप्रसंगी आमदार कैलास पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या आगमनाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ठाकरेंचा हात सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर श्री. ठाकरे रविवारी सायंकाळी शहरात दाखल झाले. त्यांच्या कार्यकर्ता मेळाव्याला मोठी गर्दी झाली असून ठाकरे नेमके राजेनिंबाळकरांचा कसा समाचार घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.