

कळंब : पंचायत समिती महायुतीचे आठ सदस्य तर ठाकरे सेनेचेही आठच सदस्य निवडून आल्यामुळे निकाल लागल्यापासून मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. कळंबच्या राजकारणाची पार्श्वभूमी पाहता काहीही होऊ शकते असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत होते परंतु दोन्ही पक्षांच्या गळाला उमेदवार लागले नाहीत.
या निवडीमधये ठाकरे सेनेकडून सीमा सुरज टेकाळे यांनी तर शिवसेनेकडून राजश्री धनंजय वरपे यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते तर उपसभापती पदासाठी ठाकरे सेनेकडून मनोज घोगरे तर भाजपाकडून प्रणिता प्रणव चव्हाण यांनी अर्ज दाखल केले होते.
मतदान घेतल्यावर दोन्ही बाजूंना समसमान मते पडल्याने पीठासन अधिकारी गणेश शिंदे यांनी ईश्वर चिठ्ठी काढण्याचे ठरवले परिणामी आणि यामध्ये सभापती पदासाठी शिवसेनेच्या वरपे तर उपसभापती पदासाठी भाजपच्या चव्हाण यांची चिठ्ठी निघाली त्यामुळे ईश्वर चिठ्ठीने सुध्दा दोन्ही पदासाठी महायुतीलाच साथ दिली.
यावेळी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांनी काम पहायले तर त्यांना सहकार्य तहसीलदार हेमंत ढोकले यांनी केले. यावेळी कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजित पिंगळे, कळंब तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे,भाजपचे पश्चिम तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, पुर्व तालुकाध्यक्ष दत्ता साळुंके, रामहरी शिंदे, प्रणव चव्हाण आदी प्रमुख नेते उपस्थित होते. निवड झाल्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. दोन्ही बाजूचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्य़ा संख्येने उपस्थित होते.
पंचायत समितीमध्ये शिवसेनेला तीन जागा व भाजपला पाच जागा असताना देखील शिवसेनेला सभापती पदाचा मान भाजपने दिल्यामुळे कळंब तालुक्यात भाजप व सेनेचा सुरू चांगलाच जुळलेला दिसून येत आहे.
सदस्यांनी सोडला मोकळा श्वास
पंचायत समितीचा निकाल नऊ फेब्रुवारी रोजी लागला यामध्ये भाजपला पाच शिवसेनेला तीन तर ठाकरे सेनेला आठ जागा मिळाल्यामुळे दोन्हीकडे समान जागा मिळाल्याने दोन्ही बाजूने त्याच दिवशी उमेदवार सहलीवर नेहले होते त्यामुळे उमेदवारांना महिनाभर सहल घडली त्यामुळे आज निवडी झाल्यावर सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.