

धाराशिव : अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने तामलवाडी येथील एका लॉजवर छापा टाकून अनैतिक देहव्यवसाय प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तीन महिलांची सुटका केली आहे.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, मिलन लॉज येथे महिलांकडून देहव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता तीन महिला (नाव व गाव गोपनीय) आढळून आल्या.
महिला पोलिसांमार्फत चौकशी केली असता आरोपी दिलीप सिद्धाप्पा मंगरुळे (वय 43, रा. अविनाश नगर, एमआयडीसी सोलापूर) व संतोष नामदेव पवार (वय 40, रा. तिऱ्हे, ता. उत्तर सोलापूर) यांच्या सांगण्यावरून महिलांना देहव्यवसायास प्रवृत्त केल्याचे समोर आले.
या कारवाईत पोलिसांनी मोबाईल फोन, रजिस्टर, युपीआय स्कॅनर, रोख 5,700 रुपये, तसेच इतर साहित्य असा एकूण 25,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.