अनोळखी महिलेच्या क्रूर हत्येचा उलगडा; पतीसह दोन आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद

Palghar crime news | चारित्र्यावर संशयातून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे
Palghar crime news
Palghar crime news
Published on
Updated on

खानिवडे : वसई पूर्वेतील शिरवली परिसरात आढळलेल्या अनोळखी महिलेच्या कुजलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा करण्यात गुन्हे शाखा कक्ष-३, विरार यांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, चारित्र्यावर संशयातून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मौजे शिरवली हद्दीत, वज्रेश्वरी-शिरसाड मार्गालगत २१ मार्च पूर्वी रमेश घरत यांच्या शेतातील जांभळाच्या झाडाजवळ गवतात एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

वैद्यकीय तपासणीत संबंधित महिलेचा गळा चिरून व डोक्यावर गंभीर मारहाण करून खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५/२०२६, भा.न्या.स. कलम १०३(१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) व सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष-३, विरार यांनी समांतर तपास सुरू केला.

मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने ओळख पटवणे मोठे आव्हान होते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक तसेच उत्तरप्रदेश येथील हरवलेल्या महिलांची माहिती तपासूनही सुरुवातीला काही धागेदोरे मिळत नव्हते. मात्र पोलिसांनी तब्बल ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सलग ७२ तासांचे फुटेज तपासून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. तपासादरम्यान रोशन रामजग यादव (वय २६, रा. नालासोपारा पूर्व) व त्याचा साथीदार भानुप्रताप विजय बहादूर यादव (वय ३०) यांना २८ मार्च २०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मृत महिलेची ओळख मधुबाला उर्फ प्रियाकुमारी रोशन यादव (वय २३, रा. आझमगड, उत्तरप्रदेश) अशी पटली असून ती मुख्य आरोपी रोशन यादव याची पत्नी असल्याचे समोर आले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत रोशन यादव याने तिला १५ मार्च रोजी उत्तरप्रदेशातून नालासोपाऱ्यात आणले व मित्राच्या मदतीने खुनाचा कट रचला. १९ मार्च रोजी दोघांनी तिला मोटारसायकलवरून शिरवली परिसरात नेऊन धारदार चाकूने गळा चिरला व दगडाने डोके ठेचून निर्घृणपणे हत्या केली, असे तपासात उघड झाले आहे. सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी मांडवी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंजीत आंधळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news