

Swabhimani stages sit-in protest outside the District Collector's office over sugarcane prices
धाराशिव, पुढारी वृत्तसेवाः यंदाच्या गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन पहिली उचल ५ हजार रुपये द्यावी, साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ५ हजार रुपये करावा आणि इथेनॉलचा दर वाढवावा, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. १) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. हातात ऊस घेऊन मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. सुमारे अर्धा तास चाललेल्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाले. यावेळी ऊसदराच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील सहकारी, खासगी, गुळ पावडर व खांडसरी कारखान्यांनी ऊसाचा दर निश्चित करून पहिली उचल प्रतिटन ५ हजार रुपये जाहीर केल्याशिवाय गाळप सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी संघटनेने केली.
कारखान्यांवरील वजनकाट्यांबाबतही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांना स्वतंत्र व अधिकृत वजनकाट्यावर ऊसाचे वजन करून घेण्याचा अधिकार असून, शेताच्या बांधावर, बाजार समितीच्या किंवा शासकीय अधिकृत वजनकाट्यावर वजन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना अडवू नये, अशी मागणी करण्यात आली.
साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ५ हजार रुपये करावा, उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर ६५ रुपयांवरून ८५ रुपये प्रतिलिटर करावा आणि वाढीव नफ्यातील ७० टक्के रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणे बंधनकारक करावे, अशी मागणी करण्यात आली. इथेनॉलच्या दरात वाढ होईपर्यंत त्यासाठी ऊस गाळप करू नये, असेही संघटनेने म्हटले.
दर ठरेपर्यंत परवानगी नको
शेतकरी संघटना व कारखानदारांची बैठक घेऊन अंतिम ऊसदर निश्चित होईपर्यंत कोणत्याही कारखान्याला गाळप परवाना देऊ नये. तसेच बॉयलर अग्निप्रदीपनाची परवानगीही देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. पहिली उचल ५ हजार रुपये रोख दिल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, असा आग्रह आंदोलकांनी धरला. आंदोलनात रवींद्र इंगळे, तानाजी पाटील, धनाजी पेदे, शहाजी सोमासे, राजभाऊ हाके, दुर्वास भोजने, संजय भोसले, विष्णू काळे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले.