

ST bus catches fire near Tuljapur, all 63 passengers safe
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : तुळजापूरहून निलेगावकडे जाणाऱ्या एका एसटी बसने शनिवारी (दि. २३) दुपारी दोनच्या सुमारास पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व ६३ प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना तुळजापूरपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर तीर्थ खुर्द गावाजवळ घडली.
माहितीनुसार, मिळालेल्या तुळजापूर आगाराची बस (एमएच २० बीएच ४२३०) नळदुर्ग मार्गे निलेगावकडे जात होती. दुपारी दोनच्या सुमारास बस तीर्थ खुर्द गावाजवळ आली असताना अचानक इंजिनमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या वाजूला थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवले.
प्रवासी खाली उतरल्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. आगीची माहिती मिळताच तुळजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे नळदुर्ग ते तुळजापूर मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती.
बसमध्ये एकूण ६३ प्रवासी होते. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. आज तीर्थ येथील नागोबा देवस्थानची यात्रा असल्याने भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे बसमध्ये जास्त प्रवासी होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.