

Anganwadi workers march at Dharashiv
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात जिल्ह्यातील मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करावी, तसेच एकरकमी लाभ आणि ग्रॅच्युईटी स्वतंत्रपणे द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच त्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून त्यासंदर्भात शासन निर्णय काढावा, राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ पासून जाहीर केलेली मानधनातील वाढ आणि प्रोत्साहन भत्ता तत्काळ लागू करावा.
तसेच, प्रोत्साहन भत्ता नियमित मानधनात समाविष्ट करून सेविकांना १५,००० रुपये आणि मदतनीसांना ८,५०० रुपये मासिक मानधन द्यावे, पोषण ट्रॅकर प आणि एफआरएसच्या तांत्रिक अडचणी सोडवाव्यात. नेटवर्क आणि ओटीपीच्या समस्यांमुळे काम न झाल्यास मानधन कपात करू नये किंवा नोटीसा देऊ नये, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थीची तपासणी तसेच एकल महिलांच्या सर्वेक्षणासारखी अतिरिक्त कामे अंगणवाडी सेविकांना लावू नयेत.
या कामांमुळे त्यांच्या मूळ कामावर परिणाम होत असून, कामाचा ताण वाढला आहे, आदी मागण्या करण्यात आल्या. या मोर्चात भगवान देशमुख, दत्ता देशमुख, प्रभावती गायकवाड यांच्यासह अनेक अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.