

Sisters injured on first day of school; Villagers protest
उमरगा, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील येणेगूर (ता. उमरगा) येथे शाळेच्या मध्यंतर सुटीत जेवणासाठी घरी जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना दोन विद्यार्थिनींना वाहनाने धडक दिली. या धडकेत दोघी सख्ख्या बहिणी जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि १६) दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली.
दरम्यान शाळेच्या पहिल्या दिवशीच ही घटना घडल्याने संतप्त ग्रामस्थांनी काही काळ महामार्ग रोखला. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, तालुक्यातील येणेगूर येथील कॅप्टन जोशी विद्यालयातील दोन सख्ख्या बहिणी शाळेला दुपारच्या सुट्टीत घराकडे जेवणासाठी निघाल्या होत्या. महामार्ग ओलांडताना महामार्ग प्राधिकरणाच्या आपत्कालीन वाहनाने दोघींना जोराची धडक दिली. या धडकेत इयत्ता १० वी वर्गात शिकत असलेली रेणुका श्रीकुमार स्वामी हिला चेहऱ्यावर दुखापत झाली.
इयत्ता ८ वी वर्गात शिकणारी तिची दुसरी बहीण गौरी श्रीकुमार स्वामी हिच्या हाताला दुखापत झाली. घटना घडताच आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारांसाठी येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. दोघीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटना घडताच संतप्त कराव्यात यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करावा अन्यथा गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली. त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला. तर पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांनी ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक यांच्या सोबत चर्चा करत लवकरच महामार्गावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणास पत्राद्वारे कळवणार असल्याचे सांगितले.
दरम्यान महामार्ग रोखल्याने दोन्ही बाजूला चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मोठी कोंडी झाली होती. दोन्ही बाजूंची वाहतूक महामार्ग पोलिसांनी सुरळीत केली.
महामार्गाच्या दुरुस्ती कामामुळे दोन्ही बाजूंची वाहने एकाच बाजूला वळवली होती. त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. तर यात आणखी एक छोटा हत्ती वाहन असून या वाहनाने एका मुलीला व दुसऱ्या बाजूने येणाऱ्या महामार्ग प्राधिकरणाच्या आपत्कालीन वाहनाने एका मुलीला धडक दिली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.