

Bhum taluka Woman brutally tortured case
भूम, पुढारी वृत्तसेवा: धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंभी गावात मानवी संवेदनशीलतेला काळिमा फासणारी घटना घडली. गावातील ५५ वर्षीय अनुसूचित जातीतील महिलेवर चौघा नराधमांनी तोंडात, गुप्तांगात तिखट टाकून, जातीवाचक शिवीगाळ करत अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, १२ जून रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेच्या घरात घुसून चौघांनी हिला गावातून हकला बघू कोण काय करते, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत तिला लाथाबुक्क्यांनी, लाकडी काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी सोबत आणलेली लाल तिखट चटणी तिच्या गुप्तांगात भरली. इतकेच नव्हे, तर तोंडात जबरदस्तीने तिखट भरून गंभीर दुखापत केली. त्यानंतर आरोपी पसार झाले.
या घटनेनंतर महिलेने आंबी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून आरोपी नितीन बळीराम गटकळ, बळीराम निवृत्ती गटकळ (दोघे रा. आंभी), विशाल घनशाम डूचे (रा. जामखेड, जि. अहमदनगर), दिनेश बहिरमल (आंभी) यांच्याविरुद्ध अ.जा.अ.ज. अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्यायसंहिता आणि विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार हे स्वतः करत आहेत. संजय पवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सविस्तर पंचनामा व पुढील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.