

ATM broken into in Bhum city, cash worth 9 lakhs stolen
भूम, पुढारी वृत्तसेवा: पार्डी रोडवरील खुशी कॉम्प्लेक्स येथे असलेल्या भारतीय स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल ८ लाख ८४ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना पहाटे अडीच ते पावणे दोनच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच भूम पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विशेष बाब म्हणजे, संबंधित एटीएमची देखभाल खाजगी कंपनीकडे असल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षक तैनात नव्हता, यामुळे चोरट्यांना अडथळा न येता चोरी करणे शक्य झाले. चोरीसाठी गॅसकटरचा वापर करण्यात आला असून, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ८ लाख ८४ हजार ५०० रुपयांची रोख रकम चोरी गेल्याचे खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सदर घटनेमुळे भूम शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शहरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत.
प्रशासनाने रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. चोरट्यांचा लवकरच माग काढला जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास अधिक गतिमान करण्यात आला आहे.