

Response to Job Festival and Self-Employment Fair
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा आमदार राण जिगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून धाराशिव शहरात आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील ५० हून अधिक नामांकित कंपन्यांच्या उपस्थितीत दोन हजारहून अधिक उमेदवारांनी मुलाखती दिली. तब्बल ४७८ युवकांना नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले आहे तर ५०३ युवकांना अंतिम मुलाखतीसाठी कंपनीत बोलावण्यात आले आहे. दर तीन महिन्याला असा महोत्सव आणि मेळावा घेण्यात येणार असून त्यामाध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आ. पाटील यांनी यावेळी सांगितले.
या मेळाव्यास २२०० हून अधिक इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती. तर ३,५०० पेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या उमेदवारांना येत्या वर्षभर त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधीबाबत माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या महोत्सवात राज्यभरातील ५० हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला व उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी विविध शासकीय महामंडळांच्या योजनांची माहिती आणि मार्गदर्शन देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते.
जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुराच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तरुण-तरुणींच्या हाताला काम मिळावे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या हेतूने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढील काळातही अशा प्रकारचे नोकरी व स्वयंरोजगार महोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना पुढील वर्षभर त्यांच्या पात्रतेनुसार रोजगाराच्या संधीबाबत माहिती दिली जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमास माजी खा. सुधाकर शृंगारे, दत्ता कुलकर्णी, नितीन काळे, विकास बारकूल, शंतनु पायाळ, खंडेराव चौरे, अमित शिंदे, सुनील काकडे, अभय इंगळे, राहुल काकडे, सौ. अस्मिता कांबळे, प्रीती कदम, उषाताई येरकळ, विद्या माने, नीलकंठ पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
दर तीन महिन्यांनी असे मेळावे घेणार
दर तीन महिन्यांनी अशा प्रकारचे रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामुळे युवकांना आपल्या दारातच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना मागील दोन वर्षांपासून विविध शासकीय योजनांद्वारे आपण मदत करत आहोत आणि हा उपक्रम पुढेही सुरू ठेवणार आहोत. याशिवाय, सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सहकायनि जिल्ह्यातील युवकांना व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, या प्रशिक्षणामुळे त्यांना अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.