Dharashiv Crime | भर रस्त्यात दरोडेखोरांचा धिंगाणा; विळ्याचा धाक दाखवून दाम्पत्याला लुटले
भूमः भूम तालुक्यातील हाडोंग्री–हिवरा दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत दरोडेखोरांनी एका दाम्पत्याला विळ्याचा धाक दाखवत तब्बल ६६ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पन्हाळवाडी येथील विकास प्रकाश चौधरी (वय ३८) हे आपल्या पत्नीसह शुक्रवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास मोटारसायकलवरून हाडोंग्रीकडे जात होते. दरम्यान, रस्त्यातील ध्यान केंद्राजवळ मोटारसायकल हळू चालल्याने, पाठीमागून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्याच्या कडेला थांबवले.
यानंतर, या इसमांनी लोखंडी विळ्याचा धाक दाखवून चौधरी दाम्पत्याला धमकावले. त्यांनी मोटारसायकलची चावी काढून घेतली व चौधरी यांच्या पत्नीच्या गळ्यातील १० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख ६ हजार रुपये असा एकूण ६६ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटला. दरोडेखोरांनी घटनेनंतर अंधाराचा फायदा घेत पसार होऊन पोलिसांना चकवले.
या घटनेनंतर विकास चौधरी यांनी २५ ऑक्टोबर रोजी भूम पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध भा. दं. सं. कलम ३०९(६), ३, ५ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरोदे करीत आहेत. या मार्गावर पोलिसांची नियमित गस्त असतानाही गुन्हेगारांनी निर्भयपणे हा प्रकार घडवून आणल्याने नागरिकांत तीव्र संताप आहे. “चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नाही,” अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून सदरील घटनेमुळे या मार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली आहे.

