

18 crores for Tuljapur pilgrimage development plan
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्य सरकारकडून भूसंपादनासाठी १८ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, जिल्हाधिकारी तथा मंदिर समिती अध्यक्ष यांच्याकडे निधी वितरित करण्याबाबत शासन आदेश जारी झाला आहे. त्यामुळे या बहुप्रतीक्षित प्रकल्पाच्या कामांना आता वेग येणार आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली.
एकूण १,८६५ कोटी रुपयांच्या या आराखड्यात मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास, भक्तनिवास, प्रसादालय, आधुनिक उद्यान, ट्रॅव्हलेटर, बहुस्तरीय पार्किंग केंद्र, तसेच तुळजाभवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा १०८ फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.
तुळजापूर आणि परिसराचा कायापालट घडवून आणणारा हा प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. भूसंपादनासाठी प्रचलित दराच्या कैकपट मावेजा देण्यात येणार असून, नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तुळजा-पूर हे जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.