

धाराशिव: मराठी ग्रामीण साहित्याला नवी दिशा देणारे आणि शेतकरी जीवनातील संघर्ष, वेदना व वास्तव आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक कै. प्रा. भास्कर चंदनशिव यांना यंदाचा मरणोत्तर ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांच्या साहित्य क्षेत्रातील दीर्घ आणि मोलाच्या योगदानाचा सन्मान म्हणून प्रदान करण्यात येणार आहे.
३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून, २९ मे २०२६ रोजी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उभारण्यात आलेल्या ‘लोकनेते अजितदादा पवार साहित्यनगरी’मध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते कै. प्रा. चंदनशिव यांच्या पत्नी कमलताई चंदनशिव यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.
या पुरस्कारामध्ये ५१ हजार रुपये रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल यांचा समावेश आहे. कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकारातून आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण साहित्याला दिली नवी दिशा
प्रा. भास्कर चंदनशिव यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण भागातील वास्तव, शेतकऱ्यांचे प्रश्न, संघर्ष आणि सामाजिक बदल यांना साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या साहित्यामध्ये मातीचा गंध, शेतीचे वास्तव आणि सर्वसामान्यांच्या जीवनातील वेदना प्रकर्षाने दिसून येतात. त्यामुळेच ग्रामीण साहित्य विश्वात त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली.
शेतकरी समाजाच्या भावना आणि आक्रोश यांना शब्दबद्ध करताना त्यांच्या लेखणीने केवळ साहित्यनिर्मिती केली नाही, तर समाजमनालाही विचार करायला भाग पाडले. त्यांच्या साहित्यामुळे अनेक वाचकांना ग्रामीण जीवनाचे वास्तव जवळून अनुभवता आले.
पुरस्कार पत्राचे वितरण
या पुरस्कारासंदर्भातील अधिकृत पत्र आज कळंब येथे कमलताई चंदनशिव यांना प्रदान करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार कैलास दादा पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, प्रा. नंदकुमार बालुरे, प्रा. उन्मेष शेकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मराठी साहित्य क्षेत्रात ग्रामीण जीवनाला आवाज देणाऱ्या प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर झाल्याने साहित्यविश्वातून समाधान व्यक्त केले जात आहे.