

Dharashiv Marathi Sahitya Sammelan: आगामी ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. रामकृष्ण परमहंस महाविद्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयामार्फत संमेलनाच्या नियोजन, समन्वय आणि व्यवस्थापनाचे कामकाज पार पडणार आहे.
दि. २९ व ३० मे रोजी लोकनेते स्व. अजितदादा पवार साहित्य नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे हे दोन दिवसीय साहित्य संमेलन होणार असून, साहित्यप्रेमींमध्ये याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत भूषविणार आहेत, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
मराठी साहित्य, संस्कृती आणि वैचारिक परंपरेचा भव्य उत्सव ठरणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी धाराशिव सज्ज झाले आहे. नवोदित लेखक, कवी आणि साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनातून साहित्य, समाज आणि संस्कृती यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील उदयोन्मुख साहित्यिकांना मोठे व्यासपीठ मिळावे, धाराशिवच्या सांस्कृतिक ओळखीला अधिक बळकटी मिळावी आणि मराठी साहित्य चळवळीला नवी ऊर्जा प्राप्त व्हावी, या दृष्टीने हे संमेलन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, प्राचार्य संदीप देशमुख, अ. भा. मराठी साहित्य परिषदेचे संयोजक परमेश्वर पालकर, साहित्य संमेलनाचे संयोजक राजा जगताप, श्रीमती नीना महामुनी, श्रीमती गुंजाळ मॅडम, दिलीप कांबळे, नगरसेवक नाना घाटगे, माजी नगरसेवक राणा बनसोडे, महेश पोतदार, दौलत निपाणीकर, सोपान पवार, जगदीश पाटील, अभिजीत देशमुख, राकेश सूर्यवंशी, अभिजीत कदम, लखन देशमुख, अजित बाकले, सावन देवगिरे, पवन स्वामी, सुयश गरड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
धाराशिवमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनामुळे जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरणात नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.