

New 500-bed hospital to be completed in 30 months
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग लगत आयुर्वेदीक महाविद्यालय लगत पाठीमागे ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय ३० महिन्यात बांधून पूर्ण होईल, असा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले, की एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून ३२६ कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आली आहे.
रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. अद्ययावत अशा सर्व सोयी सुविधांनी युक्त असे हे नवीन जिल्हा रुग्णालय असणार आहे. पुढील ३० महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार कामाचा दर्जा आणि गुणवत्ता राखून निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून अगदी काही अंतरा-वरच नवीन ५०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारले जात आहे. रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवातही झाली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिववासियांच्या आरोग्य सेवेसाठी साकारल्या जात असलेल्या या कामाची पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चौहान, नितीन काळे, सतीश दंडनाईक, अमित शिंदे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, कार्यकारी अभियंता श्री. बंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. ५०० खाटांच्या नवीन शासकीय रुग्णालय इमारतीचे एकूण बांधकाम ६५,९६९ चौरस मीटर असणार आहे.
यामध्ये १२५ आयसीयु बेड उपलब्ध असणार आहेत. या नवीन जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळे शस्त्रक्रियागर उभारण्यात येणार आहेत. एकूण ५ शखक्रिया कक्ष याठिकाणी असणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी बांधवांसाठी सुसज्ज अशी निवासस्थानेही असणार आहेत. रुग्णांना अद्यावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्राधान्याने भर देण्यात आला आहे. सौंदर्याकरणावर विशेष लक्ष देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचेही आम राणाजगजितसिंह यांनी म्हटले आहे.