

उमरगा : पंचायत समितीच्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सभापतिपदी केसर जवळगा गणातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या आकांक्षा चौगुले यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदी मुळज गणातील अपक्ष रेखा विक्रम इंगळे यांनी तीन मतांनी विजय मिळवला. या निवडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष एकत्र येत भाजपाला मोठा धक्का दिला आहे.
शहरातील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी (दि. 7) सभापती व उपसभापती निवडीसाठी पीठासीन अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीला एकूण 18 सदस्यांपैकी 17 सदस्य उपस्थित होते. जकेकूर गणातील उबाठा शिवसेनेचे सदस्य हरि जाधव अनुपस्थित होते. यावेळी तहसीलदार गोविंद येरमे आणि गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.
सुरवातीला पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी निवड प्रक्रियेची माहिती दिली. त्यानंतर निवड प्रक्रिया सुरू झाली. सभापती पदासाठी शिवसेनेच्या आकांक्षा चौगुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. उपसभापती पदासाठी भाजपचे तलमोड गणातील सदस्य दगडू कालिदास मोरे व मुळज गणातील रेखा विक्रम इंगळे यांनी अर्ज दाखल केले होते.
छाननीनंतर हात उंचावून मतदान घेण्यात आले. यामध्ये दगडू मोरे यांच्या बाजूने भाजपाचे 7 सदस्य उभे राहिले, तर रेखा इंगळे यांच्या बाजूने शिवसेना 5, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 1 व अपक्ष 1 असे एकूण 10 सदस्य उभे राहिले. तीन मतांच्या फरकाने रेखा इंगळे यांचा विजय जाहीर होताच सभागृहाबाहेर उपस्थित कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.
निवडीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी सभापती जितेंद्र शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी सभापती अभय चालुक्य, नगराध्यक्ष किरण गायकवाड आदीसह पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकाच गावच्या दोन्ही महिला
पंचायत समिती अस्तित्वात आल्यापासून प्रथमच सभापती व उपसभापती एकोंडी ज. या एकाच गावच्या रहिवाशी दोन्ही महिलांची निवड झाली.पंचायत समिती अस्तित्वात आल्यापासून प्रथमच सभापती व उपसभापतिपदी दोन्ही महिलांची निवड झाली आहे. यात विशेष म्हणजे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले या पंचायत समितीच्या सर्वात तरुण उच्चशिक्षित सभापती म्हणून निवडल्या गेल्या आहेत. यावेळी नूतन सभापती आकांक्षा चौगुले यांनी विकासाभिमुख कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीमुळे युवक व महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रथमच दोन्ही पदांवर महिला !
पंचायत समिती अस्तित्वात आल्यापासून प्रथमच सभापती व उपसभापतिपदी दोन्ही महिलांची निवड झाली आहे. यात विशेष म्हणजे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले या पंचायत समितीच्या सर्वात तरुण उच्चशिक्षित सभापती म्हणून निवडल्या गेल्या आहेत. यावेळी नूतन सभापती आकांक्षा चौगुले यांनी विकासाभिमुख कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीमुळे युवक व महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचायत समिती कामकाजात नवे विचार आणि ऊर्जा येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.