

जालना : जालना महानगरपालिकेच्या पहिल्या विशेष महासभेत चार स्वीकृत सदस्यांसह सोळा स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजपाच्यावतीने स्वीकृत सदस्यपदी सिध्दिविनायक मुळे, अर्जुन गेही, शिवसेनेच्यावतीने अश्विन भास्करराव आंबेकर तर काँग्रेसच्यावतीने विनोद रत्नपारखे यांची निवड करण्यात आली.
जालना महानगरपालिकेची पहिली विशेष महासभा शुक्रवारी सकाळी 11.00 वाजता मनपा प्रशासकीय इमारतीमधील नवीन सभागृहात महापौर वंदना अरुण मगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या पहिल्या सभेत महानगरपालिकेच्या विविध महत्त्वपूर्ण समित्यांची स्थापना आणि स्वीकृत सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.
महानगरपालिका अधिनियम आणि नियमांनुसार, महापालिकेच्या 4 स्वीकृत सदस्यांचे निवड झाल्याचे आजच्या सभेत जाहीर करण्यात आले. त्यात काँग्रेसतर्फे विनोद विठ्ठलराव रत्नपारखे, शिवसेनेच्यावतीने आश्विन भास्कर आंबेकर,भाजपाच्यावतीने सिद्धिविनायक वसंतराव मुळे व अर्जुन कबूलमल गेही यांची निवड करण्यात आली.
महानगरपालिकेच्या कामकाजात गती आणण्यासाठी स्थायी समितीसह पाच विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली.या समितीसाठी 16 सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.त्यात महिला व बाल कल्याण, बांधकाम, पाणी पुरवठा व जलनिस्सारण, शिक्षण व विद्युत, स्वच्छता व आरोग्य समितीमधे प्रत्येकी 16 सदस्यांची निवड करण्यात आली.
स्वीकृत सदस्यांच्या उमेदवारी अर्ज छाननीत भाजपाच्या दोन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याने या दोन जागांसाठी आता पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे.स्वीकृत सदस्य निवडीवरून काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख व गटनेते फारुक तुंडीवाले यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते.
यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद या निमित्ताने चव्हाट्यावर आला होता. या सभेला उपमहापौर राजेश राऊत, आयुक्त आशिमा मित्तल, अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त नंदा गायकवाड, उपायुक्त त्र्यंबक कांबळे, नगरसचिव तथा सहायक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्यासह महानगरपालिकेचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापौरांचा राजदंड देउन सन्मान
जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी या विशेष सभेत राजदंड महापौर वंदना मगरे यांना देऊन सन्मानित केले. यावेळी उपमहापौर राजेश राऊत, नगरसचिव तथा सह आयुक्त सुप्रिया चव्हाण व सहायक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांची उपस्थिती होती.