Paranda cow slaughter racket | अपघाताने उघडकीस आणले गोहत्येचे रॅकेट; स्कॉर्पिओच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, २० निष्पाप वासरांची सुटका, एक मृत

भूमजवळ अपघात; गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा अंत, चालक फरार
Paranda cow slaughter racket
Paranda cow slaughter racket Pudhari Photo
Published on
Updated on

भूम : येथील परंडा रस्त्यावर शनिवारी (दि.१४) घडलेल्या एका भीषण अपघाताने गोहत्येसाठी चाललेल्या अवैध वाहतुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. एका स्कॉर्पिओ गाडीने ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातानंतर गाडीत निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी नेली जात असलेली २० लहान वासरे आढळून आली. यातील एका वासराचाही दुर्दैवी मृत्यू झाला असून, पाच वासरे गंभीर जखमी आहेत.

अपघात आणि दुर्दैवी अंत

सविस्तर माहिती अशी की, गोलेगाव येथील रहिवासी कल्याण सोपान यादव (वय ७०) हे आपल्या मार्गाने जात असताना, एमआयडीसी आणि मूकबधिर शाळेजवळ, विसंबर रंधवे यांच्या शेताजवळ पाठीमागून वेगात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीने (क्र. एमएच १२ ईटी ६२३४) त्यांना जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच भूमचे तहसीलदार प्रवीण जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आपल्या शासकीय वाहनातून जखमी यादव यांना तातडीने भूम ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी बार्शी येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्कॉर्पिओतील धक्कादायक वास्तव

अपघातग्रस्त स्कॉर्पिओची पाहणी केली असता, उपस्थितांना धक्काच बसला. गाडीच्या आतमध्ये अत्यंत निर्दयीपणे २० वासरे कोंबण्यात आली होती. ही वासरे अंदाजे २० ते २५ दिवसांची असून, त्यामध्ये १६ नर जातीची (गोऱ्हे) आणि ४ मादी जातीची (कालवडी) वासरे होती. या सर्व निष्पाप वासरांचे तोंड चिकटपट्टीने घट्ट बांधलेले होते, तर त्यांचे पाय दोरीने बांधलेले होते. जनावरांनी कोणताही आवाज करू नये आणि त्यांची हालचाल होऊ नये यासाठी ही अमानुष उपाययोजना केल्याचे स्पष्ट दिसत होते. ही वासरे गोहत्येसाठीच नेली जात असल्याचा संशय बळावला आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तात्काळ उपचार

घटनेची माहिती मिळताच पशुधन विभागाचे डॉ. एन. ए. टकले, डॉ. आर. ए. जगदाळे, आर. आर. अंधारे यांच्यासह संपूर्ण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ वासरांची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. यापैकी पाच वासरे गंभीर जखमी असल्याचे आढळून आले, तर एका वासराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. उर्वरित १९ वासरांना पुढील उपचारांसाठी पशुसंवर्धन कार्यालयात हलवण्यात आले आहे.

चालक फरार, पोलिसांकडून तपास सुरू

अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. भूम पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, अज्ञात चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्कॉर्पिओ गाडी जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. फरार चालकाचा आणि या रॅकेटमागील सूत्रधारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

परिसरात संतापाची लाट, कडक कारवाईची मागणी

या घटनेमुळे भूम तालुक्यात आणि परिसरात संतापाची तीव्र लाट पसरली आहे. एका निष्पाप वृद्धाचा बळी गेल्याने आणि गोवंश तस्करीचा प्रकार उघडकीस आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अशा प्रकारे गोवंश जनावरांची अवैध वाहतूक आणि गोहत्येचे प्रकार वाढीस लागले असल्याची चर्चा आहे. नागरिकांनी या प्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अशा अमानुष कृत्यांमध्ये सामील असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. गोहत्येवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने अधिक कडक पावले उचलावीत, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news