

Farmers' efforts to harvest remaining soybeans
विकास उबाळे
कसबे तडवळे, पुढारी वृत्तसेवा : धाराशिव तालुक्यातील तडवळे व परिसरातील सोयाबीन काढणीला सुरवात झाली असून यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्याचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघड दिल्याने बळीराजा पाण्यात व चिखलात असलेले व काही प्रमाणात कुजलेले सोयाबीन वाचवण्यासाठी धडपडत आहेत, पण त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र दिसून येते आहे.
सध्या अव्वा ची सव्वा मजुरी देऊन शेतात चिखल आणि पाणी असल्याने या पाण्यातून चिखलातून मार्ग काढत शेतकरी आणि मजूर सोयाबीनचे ढीगारे बांधावर घालण्यास सुरवात केलेली दिसत आहे, मजुरीचे दर गगनाला भिडले असून, एक बंग सोयाबीन काढणी व गोळा करणी साठी सहा ते आठ हजार रुपयांची मजुरी द्यावी लागत आहे यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खर्चात आणखी भर पडली आहे.
सततच्या पावसामुळे आणि पाण्यात भिजल्याने काढणीला आलेल्या सोयाबीनचा दर्जा पूर्णपणे खालावला आहे. सोयाबीनचे दाणे काळे पडले असून, त्याला कोंबहीं फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही या सोयाबीनाला बाजारात योग्य भाव मिळणार नाही हे वास्तव आहे केलेला खर्च मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ यंदा बसणार नाही हे शेतकरी वर्गाच्या लक्षात येत असून शासनाने लवकरात लवकर जास्तीतजास्त मदत करावी अशी मागणी होत आहे.
सर्वच शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीला आल्याने मजूर मिळणे कठीण झाले असून, तसेच चिखलात काम करायला मजूर वर्ग तयार होत नसल्याने जे मजूर मिळत आहेत, ते अवाच्या सवा दराने मजुरी मागत आहेत, पाण्यातील व चिखलातील एक बॅग सोयाबीन काढण्यासाठी सात ते नऊ हजार रुपये तर निचरा झालेल्या जमिनीतील काढणी पाच ते सहा हजार अशी मजुरी द्यावी लागत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे एकीकडे पिकाचे नुकसान आणि दुसरीकडे काढणीचा हा अवाढव्य खर्च कसा करायचा, या विचारात शेतकरी सापडल्याचे दिसत आहे.