

As there was no road, Tehsildars provided help by sitting in tractors
वाशी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात १४ ते २३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. मांजरा नदी सहा वेळा पूरपातळीवर आली. परिणामी पारा ते फक्राबादचा संपर्क तुटला, तर जानकापूर गावात पूरपाणी शिरले. वाशी शहरातील साठेनगर परिसरासह अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
अशा स्थितीत प्रसंगी ट्रॅक्टरचा आधार तहसीलदारांनी पूरग्रस्तांना मदत पुरविली. या संकटात तहसीलदार प्रकाश मेहत्रे यांनी तत्पर उपाययोजना केल्या. जानकापूर गावचा रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र तहसीलदारांनी गावात जाऊन आंदोलकांची समजूत काढली होती.
नंतर मुसळधार पावसाने पुन्हा गावाचा संपर्क तुटला तरी मेहत्रे यांनी मंडळ अधिकारी सचिन पवार, तलाठी किशोर उद्रे, कोतवाल सचिन मेटे यांच्या मदतीने ट्रॅक्टरवरून शेतमागनि गावात जाऊन अन्नधान्य व पाण्याचे वाटप केले.
दरम्यान, पारा गावातील जोगेश्वरी तलाव धोक्याच्या पातळीवर भरला असल्याचे समजताच रात्री आठ वाजता मेहत्रे यांनी जेसीबीच्या साहाय्याने सांडव्यातील अडथळे दूर करून संभाव्य अनर्थ टाळला. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तालुक्यातील घोडकी, पारगाव, मांडवा, तेरखेड आदी गावांना तलाठ्यांना आदेश दिले. अतिवृष्टीच्या काळात जनतेच्या मदतीसाठी युद्धपातळीवर काम करणारे तहसीलदार प्रकाश मेहत्रे यांचे कौतुक होत आहे.