

Experiment with 'Bayako Majhi Ladki' in Zilla Parishad, Panchayat Samiti
बाळासाहेब जाधवर
रत्नापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या आरक्षण सोडतीत अनेक इच्छुकांच्या दांड्या उडाल्या आहेत. निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेला आरक्षणाचा खोडा आडवा येऊ शकलेला नाही. मला नाही तर माझ्या बायकोला म्हणत इच्छुकांनी निवडणूक रिंगणाची उतरण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे इच्छुक यंदाच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांत कोठे पत्नी, कोठे मुलगी, कोठे आई, तर कोठे बहिणीला मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत.
गेले दोन वर्षभर इच्छुक कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघात जोरदार तयारी केली होती. विविध स्पर्धा, शर्यती, खेळ गणेशोत्सव अशा कार्यक्रमांमधून थेट जनतेत आपली उमेदवारी जाहीर केली होती. प्रश्न फक्त आरक्षणाचा होता. त्यामुळेच आरक्षण प्रक्रियेकडे त्यांच्या नजरा लागल्या होत्या. पण अनेक ठिकाणी अनपेक्षितपणे महिला आरक्षण पडले आणि इच्छुकांच्या दांड्या उडाल्या. परंतु मैदानातून माघार नाही या त्यांनी निश्चयी भूमिकेसह निवडणुकीसाठी नव्याने मशागत सुरु केली आहे. मला निवडणूक लढवता येत नसली तरी माझ्या सौभाग्यवतीला जनतेचा भक्कम पाठिंबा आहे, अशा भूमिकेसह ते मैदानात उतरण्याची तयारी करीत आहेत.
गेले दोन वर्षभर स्वताला बॅनरवर झळकविणारे कार्यकर्ते आता आरक्षण सोडत झाल्यापासून आपल्या सौभाग्यवतींना बॅनरवर आणू लागले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बायको माझी लाडकीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात रंगणार आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी असले तरी निकालानंतर अध्यक्ष पदासह विविध समित्यांच्या सभापतीपदी आपल्या घरातील महिलेला संधी मिळू शकते. या आशेने इच्छुकांच्या आकांक्षांना चांगलेच धुमारे फुटले आहेत. मतदारसंघात महिला आरक्षणामुळे स्वतःला निवडणूक लढवता येत नसली, तरी आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून निवडून आणायचे यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्याचे उद्योग सुरु आहेत.
कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिलांना संधी
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत यंदा विशेष म्हणजे सर्वच पक्षांत ही घराणेशाही दिसणार आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत पॅनल किंवा पक्षांचे अस्तित्व ठळक नसते, पण यंदाच्या निवडणुकीत पक्षीय लढत होण्याची चिन्हे आहेत. प्रमुख पक्षांकडून उमेदवार पुरस्कृत केले जाऊ शकतात. सर्वच प्रमुख पक्षांमध्ये कार्यकर्त्याच्या घरातील महिलांना संधी दिली जाऊ शकते. मोठ्या प्रमाणात महिला आरक्षणामुळे अन्य पर्यायही नसेल. काही ठिकाणी पत्नी मातोश्रीला, तर काही ठिकाणी बहिणीला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात करण्यात आलेली आहे.