

धाराशिव : अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला शहरातील कचरा डेपो सहा महिन्यांत हलविण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यासह कर सवलत तसेच अभय योजना राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला.
तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर धाराशिव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. 2021 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने नगराध्यक्ष पद रिक्त होते. नव्याने निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच सभेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन बहुमताने निर्णय घेण्यात आले.
सभेत शहरातील कचरा डेपोचा प्रश्न प्रमुख ठरला. डेपोमुळे परिसरात दुर्गंधी, धूर व आरोग्यविषयक तक्रारी वाढत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानुसार सध्याच्या डेपोतील साचलेल्या कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून पुढील सहा महिन्यांत तो शहराबाहेर हलविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. भविष्यातील कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व दीर्घकालीन आराखडा तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करण्यासाठी अभय योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच माजी सैनिक, त्यांच्या विधवा तसेच स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सभेत सांगण्यात आले.
याशिवाय शहरातील जुन्या पथदिव्यांची दुरुस्ती करून एलईडी दिवे बसविणे, पोलिस लाईन परिसरात उद्यान उभारणे, नमो उद्यान प्रकल्पाला गती देणे, स्वच्छता निविदा प्रक्रिया राबविणे, घंटागाड्यांची दुरुस्ती, भटक्या कुत्र्यांचे नियोजन व अनधिकृत फलकांवर कारवाई आदी विषयांनाही मंजुरी देण्यात आली.
चार वर्षांनंतर झालेल्या या सभेत कचरा डेपो हटविणे, कर सवलत व अभय योजना हे निर्णय विशेष महत्त्वाचे ठरले असून शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पत्रकारांना प्रवेश नाकारला; पहिल्याच सभेत गदारोळ
दरम्यान, पालिकेच्या सर्वसाधारण सभेला पत्रकारांनाही प्रवेश देण्याची आजवरची प्रथा यंदा पहिल्यांदाच भाजपच्या नगरसेवक, नगराध्यक्षांनी मोडली. सभागृहात उपस्थित असलेल्या पत्रकारांना नगराध्यक्षांनी बाहेर जाण्यास सांगितले. याला विरोधी पक्षाचे नगरसेवक प्रदीप मुंडे, राजाभाऊ पवार, सिध्दार्थ बनसोडे यांनी हरकत घेतली. पत्रकारांना उपस्थित राहण्यास सत्ताधाऱ्यांना का भीती वाटत आहे. पारदर्शक कारभार असेल तर पत्रकारांना का बसू दिले जात नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती विरोधी पक्षाने केली. या वेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मात्र तटस्थ भूमिका घेतली.