

Dhule Solapur Highway Accident
रत्नापूर : धुळे-सोलापूर महामार्गावरील तेरखेडा येथे स्कुटीला समोरून धडक देऊन १९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या टेम्पोचालकाला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शुभम अच्युत काळे (वय २२, रा. राजेशनगर, ढोकी, ता. जि. धाराशिव) याला टेम्पोसह पकडले. आरोपी आणि वाहन पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
२९ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता यशराज श्रीकृष्ण चव्हाण (वय १९, रा. लक्ष्मीनगर, भूम) हा स्कुटी क्रमांक एमएच २५ बीएच ५५८१ वरून प्रवास करीत होता. तेरखेडा येथील वनविभागाच्या जागेसमोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर अज्ञात वाहनाने निष्काळजीपणे वाहन चालवत त्याच्या स्कुटीला समोरून धडक दिली. या अपघातात यशराज गंभीर जखमी झाला. मात्र, त्याला मदत अथवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. उपचारादरम्यान यशराजचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृत यशराजचे वडील श्रीकृष्ण रामलिंग चव्हाण (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३० सप्टेंबर रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४१/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १३४ (अ), १३४ (ब) आणि १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना येरमाळा पोलिसांसह धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा माग काढला. संबंधित वाहन ढोकी येथील राजेशनगर परिसरातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. त्यानुसार शुभम काळे याला एमएच ४७ वाय ३४२५ क्रमांकाच्या अशोक लेलँड टेम्पोसह ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत घोडके, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे आणि शिवाजी घाडगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करीत आहेत.