

Dharashiv News: A new leap for tourism based on the heritage of 29 monuments
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : प्राचीन लेणी, भुईकोट किल्ले, धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध असलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आता नियोजनबद्ध चालना मिळत आहे. जिल्ह्यातील तब्बल २९ स्मारके राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित असून, या वारशाच्या संवर्धनासोबतच भाविक आणि पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
धाराशिव जिल्ह्याला राष्ट्रकूट काळापासूनचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तुळजाभवानी मंदिर, धाराशिव व चामर लेणी, नळदुर्ग व परंडा किल्ले, तेर येथील प्राचीन वास्तू, माणकेश्वरचे महादेव मंदिर यांसह विविध स्थळांमुळे जिल्ह्यात धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाची मोठी क्षमता आहे.
जिल्हा नियोजन समितीअंतर्गत गड-किल्ले, मंदिरे आणि संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी १४ कोटी ३४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून तुळजापूर येथील घाटशीळ मंदिर, वडगाव (देव) येथील खंडोबा मंदिर, धाराशिव लेणी, चामर लेणी आणि नळदुर्ग किल्ला (भाग-२) येथे विकासकामे सुरू आहेत.
पर्यटनस्थळांचा विकास केवळ सुशोभीकरणापुरता मर्यादित न ठेवता स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचीही क्षमता आहे. भाविक पर्यटकांची संख्या वाढल्यास वाहतूक, निवास, भोजन, हस्तकला, लघुव्यवसाय आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.
उपळा येथील त्रिकुटेश्वर मंदिर, तेर येथील मुलानी टेकडी आणि धाराशिव येथील शिवगुरू समाधी या तीन स्थळांच्या विकासाचे प्रस्तावही पुढे आले आहेत.